संजय पाटील, कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मोरणा विभागात आठवडी बाजाराच्या कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी व्यापारी विक्रेत्यांचे दोन गट आमने-सामने आल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मोरणा भागातील पेठशिवापूरमध्ये यापूर्वी बाजार भरत होता. मात्र, काही महिन्यांपासून मोरगिरी येथे मात्र पेठशिवापूर ग्रामपंचायत हद्दीतच बाजार भरण्यास सुरुवात झाल्याने वादाची ठिणगी पडली. या वादातूनच गत काही दिवसांपासून मोरणा भागातील वातावरण गढूळ बनले आहे. त्यातच गुरुवारी दोन गट आमने-सामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांच्यासह पोलीस फौजफाटा त्याठिकाणी दाखल झाला.
पोलिसांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारीही गावात तळ ठोकून आहेत. तणावपूर्ण परिस्थिती आणि दाखल झालेल्या फौजफाट्यामुळे विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.