सातारा : तालुक्यातील मालगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंपण घालून अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मध्यस्थीनंतर तब्बल ५० फूट तारेचे कुंपण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालगाव येथील संतोष उघडे यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीचा रस्ता तारेचे कुंपण घालून अडविण्यात आला होता. पाचशे फुटांवर स्मशानभूमी असताना तारेच्या कुंपणामुळे तब्बल दोन किलोमीटर अंतर पार करून स्मशानभूमीकडे जावे लागणार होते. तारेच्या कुंपनामुळे गावातील नागरिक संतप्त झाले.
तणावाची परिस्थिती ओळखून तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी पोलीस फौज फाट्यासह मालगावात धाव घेतली.स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता फार पूर्वीपासून आहे. मात्र, संबंधित मालकाने काही दिवसांपूर्वी सिमेंटचे पोल रोवून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद केला होता.
त्यामुळे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी संबंधित मालकाला ‘तुमचा जो काय वाद असेल तो न्यायालयात दावा दाखल करून रितसर कब्जा घ्या, अत्यंविधी रोखून समाजात तेढ निर्माण करू नका,’ अशी त्यांची समजूत घातली. महसूल विभागाकडेही रितसर जागेचा प्रस्ताव पाठविण्यास संबंधितांना सांगण्यात आले. काहीवेळातच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने ५० फुटांपर्यंत असलेले तारेचे कुंपण काढण्यात आले. त्यानंतर संतोष उघडे यांच्या वडिलांवर अधिकाºयांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला.सामाजिक सलोख्यासाठी वृक्षारोपणही..तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी मालगावमध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अंत्यविधी झाल्यानंतर गावात वृक्षारोपणही केले. वृक्षारोपणावेळी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारा तालुक्यातील मालगाव येथे तारेचे कुंपण घालून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आला होता. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी हे कुंपण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले.