उंब्रज : विभागातील एका विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थिनीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित विद्यार्थिनीच्या संपर्कातील इतर विद्यार्थिनींची कोरोना तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.उंब्रज विभागातील एका विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकाचा कोरोना अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. तसेच संबंधित विद्यार्थिनी विद्यालयात आली असताना थर्मल स्कॅनिंगमध्ये तिच्या शरीराचे तापमान जास्त आढळल्यामुळे तिची कोरोना तपासणी करण्याची सूचना विद्यालय व्यवस्थापनाने पालकांना केली.
त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी तिच्यासह वडील व बहिणीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये संबंधित विद्यार्थिनीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव व्यवस्थापनाने विद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.