सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजकीयच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे औचित्य साधून गांधी मैदानावर पार पडलेल्या संगीत मैफलीत उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत ‘तेरे बिना जिया जाए ना’ हे गाणं गात सातारकरांची मने जिंकली.खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समूहाकडून जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली होती. सातारा शहरात शुक्रवारी दिवसभर महाआरोग्य शिबिर, भिक्षेकरी गृहात अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, वहीतुला, विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वाटप, असे कार्यक्रम पार पडले. प्रत्येक कार्यक्रमाला खा. उदयनराजे यांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
दरम्यान, सकाळी जलमंदिर या निवासस्थानी खा. उदयनराजे यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यानंतर राजमाता कल्पनाराजे यांनी त्यांचे औक्षण करून कंदी पेढाही भरवला. सायंकाळी ६ वाजेनंतर जलमंदिर येथे उदयनराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी सातारकरांची प्रचंड गर्दी लोटली.वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गांधी मैदानावर संगीत मैफलीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उदयनराजे यांनी सातारकरांना उद्देशून ‘तेरे बिना जिया जाए ना’ या गाण्याचे काही बोल सादर केले. या गाण्याला सातारकरांनी टाळ्या अन् शिट्यांनी दाद दिली. ‘तुमचं माझ्यावरील प्रेम असंच राहुदेत’, अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजीउदयनराजे समर्थकांनी वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता खा. उदयनराजे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केक कापण्यासाठी जलमंदिरमधून बाहेर पडताच ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
सिने अभिनेत्यांकडूनही शुभेच्छाप्रत्यक्षात भेट होऊ न शकल्याने सिने अभिनेता रितेश देशमुख, मकरंद अनासपुरे, श्रेयस तळपदे, स्वप्नील जोशी, विवेक ऑबेरॉय यांनी खा. उदयनराजे भोसले यांना खास व्हिडीओच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.