महाबळेश्वर: महाबळेश्वर तळदेव रस्त्या नजदीक बुर्डाणी गावांच्या जवळ महाबळेश्वरहून १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुकदेव गावानजीक (कोट्रोशी रस्ता) तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पोला अपघात झाला. टेम्पो 500 फुट खोल दरीत कोसळल्याने टेम्पोमध्ये एकूण 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर येथे आले असल्याची माहिती मिळत असून, आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातातील जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"