आॅनलाइन लोकमत
वडूज (सातारा), दि. 28 - टंचाई काळात २०१२ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आर्थिक घोटाळा झाला. वरिष्ठांना कळवूनही कारवाई होत नाही, असा आरोप करून मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव निकम यांनी शुक्रवारी दुपारी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. दरम्यान, संघटनेच्या पदाधिका-यांनी महसूल कार्यालयाला बाहेरून कड्या लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत माहिती अशी की, २०१२ च्या टंचाई परिस्थितीत खटाव तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला. त्यामध्ये संबंधित अधिका-यांनी भ्रष्टाचार केला असून, पाच वर्षांपासून अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेता अधिका-यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच तत्कालीन उपविभागीय अधिकारी व ठेकेदारांविरुद्ध लेखी तक्रार होती. उपविभागीय अधिका-यांची चौकशी वरिष्ठ अधिका-यांनी करणे गरजेचे होते. परंतु या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदारांची नियुक्ती केली. त्यांनी चौकशी न केल्याने पुन्हा तहसीलदारांची नियुक्ती केली. कसलीही चौकशी न करता प्रकरण दडपण्याचा प्रशासन प्रयत्न झाल्याचा आरोप सदाशिव निकम यांनी केला आहे.
तसेच त्या वर्षात पाणीपुरवठा करणा-या टँकरचे मालक सदाशिव निकम असताना त्यांच्याकडून कोणतीही कागदपत्रे न घेता तो टँकर पाणी वाहतुकीत लावला. त्याकाळी संबंधित ठेकेदार व तत्कालीन प्रांताधिका-यांनी वाहने पाणीपुरवठ्यावर लावली. या वाहतुकीच्या बिलापोटी लाखो रुपयांची बिले काढली. याबाबत गेल्या पाच वर्षांपासून कागदोपत्री तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने निकम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
कार्यालयास बाहेरून कड्या
निकम यांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याचवेळी निकम यांचे मित्र व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारांच्या कड्या लावून निषेध केला. त्यामुळे प्रशासनाची पळापळ झाली.