सातारा : रविवारी दुपारी बारा साडेबारा वाजता कंट्रोल रूममध्ये फोन खणखणतो.. पलीकडून घाबरत घाबरत माहिती दिली जाते. बसस्थानकासमोरील सेव्हन स्टार इमारतीमध्ये दोन शस्त्रधारी अतिरेकी घुसले आहेत.. हा फोन कंट्रोलरूमधील पोलिसांनी ऐकल्यानंतरधोक्याचा सायरन वाजविला जातो. काही क्षणातच स्पेशल फोर्सचे कमांडो आणि साताºयातील सर्व पोलीस तत्काळ इमारतीला वेढा देतात.बसस्थानकासमोर नागरिकांची नेहमी प्रचंड वर्दळ असते. अशा प्रकारची ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असतात. त्यामुळे अशा ठिकाणी अचानक कोणतीही परिस्थिती उद्भवली तर या अशा घटनेला कसे प्रत्युत्तर द्यायचे, यासाठी पोलिसांनी रविवारी मॉकड्रील करण्याचा निर्णय घेतला; परंतु याची काही मोजक्याच अधिकाºयांना कल्पना देण्यात आली. सेव्हन स्टार इमारतीमध्ये अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पाच मिनिटांच्या आत शस्त्रधारी स्पेशल फोर्स, श्वान, बॉम्ब स्कॉडच्या पथकासह पोलिसांची कुमक तेथे पोहोचली. पोलिसांची पळापळ, हातात रोखलेल्या बंदुका पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. कावरेबावरे चेहरे आणि अस्वस्थता नागरिकांच्या चेहºयावर दिसत होती. काही क्षणातच पोलिसांनी इमारतीला वेढा दिला. आजूबाजूचे फळ विक्रेते, नागरिकांना दूरवर जाण्यास पोलिसांनी सांगितले. परिसर मोकळा झाल्यानंतर स्पेशल फोर्सची शस्त्रधारी टीम इमारतीमध्ये घुसली. २६/११ ला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये जात हॉटेलमध्ये ज्या प्रकारे एनएसजी कमांडोंनी कारवाई केली होती. त्याच धर्तीवर सातारा पोलिसांच्या कमांडो पथकाने एक-एक जिना कव्हर करत दुसºया मजल्यावर धाव घेतली. इमारतीमधील एका मोठ्या पॅसेजमध्ये लपलेल्या दोन अतिरेक्यांना बंदुकीचा धाक दाखवून ताब्यात घेण्यात आले. तर दुसºया अतिरेक्याला पायावर गोळी मारून जखमी केले गेले. सुमारे दीड तासानंतर सेव्हन स्टार इमारत सुरक्षित असल्याचे पोलिसांनी घोषित केले. बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांना या ठिकाणी अतिरेकी नसून हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला.काही क्षणात वाहतूक वळवली..एरवी बसस्थानकासमोर वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले पाहायला मिळतात. परंतु या मॉकड्रीलच्या निमित्ताने या ठिकाणची वाहतूक काही क्षणातच सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे सुरू होती. कोणीही धावाधाव अथवा घाईगडबड केली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक या ठिकाणी नेहमीच असावी, अशी अनेकांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली.
साताऱ्यात घुसले दहशतवादी; सेव्हन स्टार इमारतीमध्ये पोलिसांचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 11:32 PM