विहे गावात गत पंधरा दिवसांत अनेकांना कोरोना लागण झाल्याने त्यांना विहे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर आजपर्यंत अनेकांना घरीही सोडण्यात आले आहे. सुमारे दोन महिन्यांनंतर जिल्हा अनलॉक झाला. मल्हारपेठसह तालुक्यातील बाजारपेठा तब्बल दोन महिन्यांनंतर सुरू केल्या. गत आठवड्यात तालुक्यातील मुख्य बाजारपेठा अनलॉक करताना प्रथम व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने तालुक्यातील मल्हारपेठ, नवारस्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने रॅपिड टेस्ट केली.
अचानक विहे बसथांब्यावर आरोग्य केंद्राची गाडी आल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी प्रशासनाने प्रत्येक दुकानदाराची कोरोना टेस्ट घेतली. यामध्ये बाजारपेठेतील तब्बल ६० व्यापारी व ग्रामस्थांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
यावेळी सरपंच दिनकर कुंभार, उपसरपंच अविनाश पाटील, सदस्य नितीन पाटील, विक्रम पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पवार, पोलीस पाटील हिंमत पवार, ग्रामविकास अधिकारी शिवाजी चंदुगडे व सर्व व्यापारी उपस्थित होते.
फोटो : २९केआरडी०२
कॅप्शन : विहे, ता. पाटण येथील बसथांब्यावर दुकानदार व ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. (छाया : सुनील साळुंखे)