पाचगणी : जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण कमी होत नसल्याने कोरोनासंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी फिरत्या आरोग्य पथकाने गाडीतून प्रत्येक ठिकाणी जाऊन अँटिजन तपासणी करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी करहर येथे सोमर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ४८ जणांची अँटिजन तपासणी केली. यामध्ये सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना संसर्गाला रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन अधिक गतिमान झाले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक ठिकाणी जाऊन अँटिजन तपासणी करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी करहर बसस्थानक परिसरात सोमर्डी ग्रामीण रुग्णालय व करहर पोलीस दूरक्षेत्र यांच्या सहयोगाने येणाऱ्या जाणाऱ्या ४८ व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. यामध्ये काही व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने स्वतःची अँटिजन तपासणी करून घेतली. याकरिता सोमर्डी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवकांना करहर पोलिसांनी सहकार्य केले.
चौकट :
कोरोनाला हद्दपार करण्याकरिता जिल्हा प्रशासन हा गावोगावी जाऊन कोरोना टेस्टचा उपक्रम राबवित आहे. यानिमित्ताने जिल्हाभर हे अभियान राबविले जात असल्याने नक्कीच कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
फोटो २५करहर-कोरोना
जावळी तालुक्यातील करहर येथे शुक्रवारी रुग्णवाहिकेतून जाऊन ग्रामस्थांची कोरोना चाचणी घेण्यात आली. (छाया : दिलीप पाडळे)