लोकमत न्यूज नेटवर्क:
सातारा: कोरोना चाचण्या कमी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र सातारा जिल्ह्यात याहून उलट परिस्थिती असून कोरोना चाचण्या अधिक वाढवल्या जात आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही आणखीनच वाढत आहे. परिणामी पॉझिटिव्हिटीचा दर १५ टक्के कायम राहिला आहे.
जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र साताऱ्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. रोज हजार ते दोन हजारजणांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. अनेक जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट होत आहेत. अँटिजन टेस्टमध्ये अनेकजण निगेटिव्ह येत आहेत. मात्र त्याच व्यक्तीची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्यक्षात चाचण्या कमी झाल्याने असे घडत असल्याचे दिसून येत आहे.
विशेषता जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या ठिकाणी दिवसाला दीड हजार ते दोन हजार चाचण्या होत आहेत. अद्यापही चाचण्यासाठी लोक रांगा लावत आहेत. जितक्या गतीने चाचण्या केल्या जात आहेत. तितक्या पटीने रुग्ण संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
चौकट: ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच!
ग्रामीण भागामध्ये कोरोना चाचणी करण्यास ग्रामस्थ पुढे येत नाहीत. आपल्याला कोरोना झाला आहे, हे गावात समजले तर आपल्याला वाळीत टाकतील. आपल्याशी कोणीही बोलायचे नाही, अशी भीती ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
चौकट: अँटिजन टेस्टपेक्षा आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह!
अँटिजन टेस्टच्या तुलनेत आरटीपीसीआर टेस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. बऱ्याचदा एंटीजन टेस्ट लोकांच्या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे लोक काही झाले नाही, असे समजून घरी जात आहेत. घरात गेल्यानंतर त्रास होऊ लागल्यानंतर लोक पुन्हा रुग्णालयात येत आहेत. अशावेळी जर संबंधित रुग्णाने आरटीपीसीआर टेस्ट केली तर त्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडत आहेत.
कोट: इतर जिल्ह्यात कोरोना चाचण्या वेगाने होत आहेत की नाही हे माहिती नाही. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना चाचणीवर अधिक भर देण्यात आला आहे. अत्यंत वेगाने चाचण्या करण्यात येत आहेत. लसीकरणही करण्यात येत आहे. लवकरात लवकर करून ही लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा