लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून आपला व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या महाबळेश्वर येथील एका कापड व्यावसायिकाला पालिकेच्या विशेष पथकाने ६० हजाराचा दंड ठोठावला, तसेच संबंधित दुकान सील करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून काही निर्बंध घातले आहे. असे असतानाही काही व्यावसायिक नियम झुगारून चोरी-छुपे आपला व्यवसाय करीत आहेत. बाजार पेठेतील एक कापड दुकान मागील बाजुने सुरू होते. तेथे काही ग्राहकही असल्याची खबर मुख्याधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर, पालिकेच्या विशेष पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असताना, दुकानात पाच ते सहा ग्राहक, सेल्समन व दुकान मालक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.
मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, दुकानात उपस्थित असलेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन दुकानदारास साठ हजारांचा दंड पथकाकडून ठोठविण्यात आला, तसेच दोन्ही बाजूंची सील करण्यात आले. येथील ऑर्चिड मॉलमधील तीन दुकाने पालिकेच्या विशेष पथकाने सील केली होती. ही कारवाई ताजी असतानाच बुधवारी येथील कापड दुकान सील करण्यात आले.