सातारा : शहरातील भूविकास बँक चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दुचाकी चोरीचा प्रयत्न करून पळत होता. त्याला शाहूपुरी वाहतूक शाखेच्या पोलिसाने एक किलोमीटर धावत पकडल्याचा थरार घडला.याबाबत माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनायक मानवी गुरुवारी सकाळी भूविकास बँक चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. दरम्यान, एकजण बराच वेळ पेट्रोल पंपाशेजारी लावल्या दुचाकीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होता.त्याला कॉन्स्टेबल मानवी यांनी हटकले असता तो पळू लागला. मानवी यांना शंका आल्याने त्यांनी धावत त्याचा पाठलाग सुरू केला. तब्बल एक किलोमीटर चोरटा पुढे आणि पोलीस मागे असा थरार सुरू होता. त्यामुळे भूविकास बँक ते जुना आरटीओ चौकात बघ्यांनी चांगलीच गर्दी केली. काही वेळानंतर पोलिसाने चोरट्याला पकडून त्याला पोलिसी खाक्या दाखवला.
त्यावेळी त्याने दुचाकी चोरत असल्याचे कबूल केले. तसेच त्याने यापूर्वीही अनेक दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.