कऱ्हाड : ‘उद्धव ठाकरेंना गुळाची ढेप दिली तर हे महाशय फळ एवढे आहे, तर झाड केवढे असेल, असे म्हणतील. अशा लोकांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय कळणार. त्यांच्या हाती राज्याची सूत्रे द्यायची का?,’ असा सवाल शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी केला. गोपाळनगर-कार्वे येथे कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. बाबूराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य जयवंतराव जगताप, सरपंच वैभव थोरात, उपसरपंच ज्ञानदेव हुलवान, माजी उपसरपंच सुनील शिंंदे, प्रवीण पाटील, संपतराव थोरात, आरपीआयचे नेते अप्पासाहेब गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मारुती जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, माणिकराव थोरात, शब्बीर मुजावर, संभाजी थोरात यांची उपस्थिती होती. गोडसे म्हणाले, ‘बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीना ते चार महिन्यांत परत जाणार, असे वाटले होते. परंतु चार वर्षे कधी संपली हेही त्यांनाच कळाले नाही. काँग्रेसची आघाडी तुटली ते बरे झाले. कारण गेली १५ वर्षे राज्यातील काही मतदारसंघांत हाताचे चिन्ह गायब झाले होते. आता तेच चिन्ह सर्वत्र दिसू लागले आहे. दक्षिणेचे आमदार म्हणतात की, मला बाबांनी अडकविले; परंतु जे काही बोलता ते तुम्ही सहानुभूतीसाठी बोलत आहात. दुसऱ्या भाजपच्या उमेदवाराने उत्तर व दक्षिणमधील तरुणांना व्यसनाधीन केले. या दोघांनाही जनता नाकारेल.’ आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘एकीकडे पृथ्वीराज बाबा हे विकासबाबा ठरले, तर दुसरीकडे बिसलरी बाबा आहेत. ते बिसलरीच्या पाण्याने हात धुतात. विद्यमान आमदारांचा साखर कारखाना बंद पडला़ कोयना दूध संघाचे तर त्यांनी वाटोळे केले. पृथ्वीराज चव्हाणांनी साडेतीन वर्षांत दक्षिणमध्ये विकासाची गंगा आणली. शिक्षण, आरोग्य, शेती व सोयी-सुविधा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. त्यांच्या संकल्पेनतून राजीव गांधी जीवनादायी योजनाही लोकोपयोगी ठरली आहे. तसेच १०८ व १०४ टोलफ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर अत्याधुनिक रुग्णवाहिका व रक्तपेढीची सोय झाल्याने हजारोंचे प्राण वाचले आहेत.’ संभाजी थोरात यांचे भाषण झाले. आनंदा पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप जाधव यांनी स्वागत केले व आभार मानले. (प्रतिनिधी)
ठाकरेंना शेतकऱ्यांच्या व्यथा काय समजणार?
By admin | Published: October 09, 2014 9:20 PM