पाटण : तालुक्यातील अनेकांना सुमारे ५० लाखांना गंडा घालणारा ठकसेन व त्याच्या टोळीने कर्नाटकच्या दिशेने पोबारा केल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे. पाटण पोलिसांचे पथक संशयितांच्या मागावर आहे. दरम्यान, पाटणमध्ये भाड्याने घेतलेली इंडिका कार घेऊन पसार झालेले आरोपी कर्नाटकच्या दिशेने गेले असल्याचे त्या मार्गावरील टोलनाक्यावर तपास केल्यानंतर समोर आले आहे. पाटण येथे ऐन लग्नसराईत संसारोपयोगी वस्तू अर्ध्या किमतीत मिळण्याचे दुकान ‘मून होम निड्स’ थाटण्यात आले होते. त्याच्या मालकाने लोकांना आमिष दाखविले. सुरुवातीला काही ग्राहकांना वस्तू दिल्या. त्यामुळे अनेकांनी पाच हजारांपासून ५० हजारांपर्यंत रक्कम यामध्ये गुंतवली. त्यानंतर तो महिन्याच्या आतच दि. १६ रोजी सुमारे ५० लाखांचे गाठोडे गोळा करून पसार झाला. त्यामुळे टीव्ही, फ्रीज, कपाट, सोफासेट, भांडी अशा वस्तू मिळणार या आशेवर असणार्या ग्राहकांना यामुळे मोठा धक्का बसला. पाटण तालुक्यातील सुमारे ५०० लोकांनी यामध्ये पैशाची गुंतवणूक केली असल्याचे समोर आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी पाटण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यापैकी २५ जणांनी पाटण पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर पाटण पोलिसांनी मोहम्मद गणी मोहम्मद सुलतान या नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पॅनकार्डवर असणार्या छायाचित्राच्या आधारे फसवणूक करणारी व्यक्ती सापडू शकते, असा पोलिसांना अंदाज आहे. त्यातच नाटोशी येथील सचिन सुर्वे यांची इंडिका कार पळवून नेली असून, त्या आधारेही पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. (प्रतिनिधी) पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर २० जून रोजी मतदान : आदर्श आचारसंहिता लागू सातारा : ‘महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील काही विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्याअंतर्गतच पुणे पदवीधर मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक दि. २० जून रोजी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे विभागात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली. राज्यातील तीन पदवीधर मतदारसंघांतील विधान परिषद सदस्य आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील सदस्यांची मुदत दि. १९ जुलै रोजी संपत आहे. या मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. याअंतर्गत पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना दि. २७ मे रोजी काढण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जून आहे. छाननी दि. ४ रोजी होणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज दि. ६ जूनपर्यंत मागे घेता येणार आहेत. मतदान दि. २० जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजीणी दि. २४ ला सकाळी ८ पासून होणार आहे. (प्रतिनिधी)
ग्राहकांना गंडा घालणारा ठकसेन कर्नाटकात
By admin | Published: May 22, 2014 12:09 AM