सातारा : सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे.पालिका व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या कारभारामुळे टपरीबहाद्दरांना रान मोकळे पडले आहे. या रस्त्याचे मोठ्या थाटात चौपदीकरण करण्यात आले. बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमणहटविण्यात आले. एवढेच काय पण बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर असणारे महाकाय वडाचे झाडही तोडून टाकण्यात आले. या रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर पुन्हा अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत.जिल्हा परिषद सभापती निवासाच्या बाहेरच्या फूटपाथवरच आता खोकी थाटलेली पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर वाहनांचा वेग मोठा असतो. पादचाऱ्यांना फूटपाथवरुन चालण्याशिवाय पर्याय नाही. आता या खोक्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालण्याशिवाय पर्याय उरललेला नाही. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालय याचा परिसरात असल्याने येथे मोठी गर्दीही असते.पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मात्र पालिका किंवा बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र कारवाई का करत नाही, यात नेमके काय काळे बेरे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फूटपाथवर मांडलेली खोकी कुणाच्या आशीर्वादाने आली? तसेच याला पालिका व बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची फूस आहे का? यातून निर्माण होणारा काळाबाजार जनतेसमोर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत.
साताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष : पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 4:02 PM
सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे.
ठळक मुद्देसाताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा