सातारा : अजित पवार यांच्यावर महायुतीत नव्हे, तर तुमच्या राष्ट्रवादीतच अन्याय होत होता. त्यामुळेच ते आमच्यासोबत महायुतीत आले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर महायुतीत अन्याय होत असल्याचे विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी छेडले असता शंभूराज देसाई म्हणाले, सुप्रियाताईंचे विधान चुकीचे आहे. उलट राष्ट्रवादीतच त्यांच्यावर अन्याय होत होता. त्यामुळेच अजित पवार हे महायुतीत आले आहेत. अजित पवार समाधानी नव्हते, म्हणून ते मकरंद पाटील यांच्यासमवेत आमच्यासोबत आले.साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून लाडकी बहीण बॅनरमधून अजित पवार यांचा फोटो वगळला असल्याबाबतही देसाई यांनी हा भाजपशी संबंधित प्रश्न असून, उत्तर देणे टाळले तर एकनाथ खडसे यांनी अद्याप राष्ट्रवादीत असून भाजपात प्रवेश झाला नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतही हा प्रश्न राष्ट्रवादी आमदारांना विचारावा, असे सांगितले.नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या अनुषंगाने उपस्थित प्रश्नावर देसाई म्हणाले, प्रकल्पात जी गावे समाविष्ट झाली आहेत तेथील लाेकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे. हा प्रकल्प करताना लोकांची गैरसोय होणार याची काळजी घेतली जाणार आहे. यावेळी मेढा नगरपंचायतीच्या कचऱ्याबाबत सोनगाव ग्रामस्थांचे शिष्टमंडळ भेटून गेले असून, याबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मकरंद आबांची पंचाईतअजित पवार राष्ट्रवादीत समाधानी नसल्यामुळेच मकरंद आबांना घेऊन महायुतीत आल्याचे देसाई यांनी सांगताना शेजारी बसलेल्या मकरंद आबांना ‘होय ना आबा?’ असे विचारताच आ. पाटील यांची मात्र अडचण झाली. एकेकाळी खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ असलेल्या आबांना हो म्हणावे तरी पंचाईत अन् नाही म्हटले, तरी पंचाईत अशी स्थिती झाली. परंतु, त्यांनी उत्तर न देता केवळ स्मित करून वेळ मारून नेली.