सातारा : पुणे जिल्ह्यातील विहम (ता. खेड) येथे आढळून आलेली १५ ते १८ व्या शतकातील तांब्याची १४७ नाणी पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, विहम येथील सुयश रोकडे हा मुलगा ४ जानेवारी २०२२ रोजी रोहिदास सावंत यांच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी त्याला शेतात तांब्याची नाणी दिसून आली. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदारांनी ती नाणी ताब्यात घेऊन संशोधनाकरिता पुणे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात दिली.संशोधनानंतर ही नाणी १५ ते १८ व्या शतकातील असल्याचे समोर आले. गुरुवारी सकाळी पुणे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांनी सर्व नाणी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपुर्द केली.
शिवराई ते ईस्ट इंडिया कंपनीतांब्याची नाणी १५ वे १८ व्या शतकातील असून, यामध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी, सुलतान नाणी, निजामशाही नाणी व ईस्ट इंडिया कंपनीच्या नाण्यांचा समावेश आहे.
- एकूण नाणी : १४७
- वजन : २.४० किलो ग्रॅम
संग्रहालयात दोन वर्षांत जमा झालेला ऐतिहासिक ठेवा
- सातारा पोलीस वसाहत येथील पुरातन तोफ
- इंदापूर येथील चांदीची ७० नाणी
- पिंपरी चिंचवड येथील अडीच किलो सोन्याची नाणी
- अजिंक्यतारावरील लोखंडी तिजोरी
- अजिंक्यतारावरील ब्रिटिशकालीन दोन खांब
- पुणे येथील १४७ तांब्याची नाणी
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात गेल्या दोन वर्षांत अनेक ऐतिहासिक वस्तू दाखल झाल्या आहेत. या सर्व वस्तूंचे संग्रहालयाच्या नूतन इमारतीत संवर्धन केले जाईल. - प्रवीण शिंदे, अभीरक्षक