सातारा : सातारा शहरातील सार्वजिनिक रस्त्यावर भरधाव वेगात आणि बेदरकारपणे कार चालविणाऱ्या रेकाॅर्डवरील आरोपीने थांबण्याचा इशारा केल्याने पोलिसालाच धमकी दिली. तसेच शासकीय कामातही अडथळा आणला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या संबंधितावर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार संतोष शेलार यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अक्षय लालासो पवार (रा. खंडोबाचा माळ, सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार शहरातील पोलिस ठाणे ते बसस्थानक मार्गावर घडला. हवालदार शेलार हे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बसस्थानकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पोलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील आरोपी अक्षय पवार हा कार (एमएच, ११. एएफ, १) मधून जात होता. त्याची गाडी भरधाव वेगात होती. रस्त्याच्या परिस्थितीकडे न पाहता तो बेदरकारपणे वाहन चालवत निघाला होता. त्यामुळे अपघाताची भीती असल्याने हवालदार शेलार यांनी त्याला गाडी थांबविण्याबाबत हाताने इशारा केला. तरीही त्याने गाडी भरधाव नेली. तसेच हवालदार शेलार यांना बघून घेतो अशी म्हणून धमकी दिली. तसेच शेलार यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार जाधव हे तपास करीत आहेत.
Satara: गाडी थांबवण्याचा इशारा केला; रेकॉर्डवरचा आरोपी पोलिसालाच 'बघून घेतो' म्हणाला
By नितीन काळेल | Published: February 16, 2024 12:44 PM