सातारा : जिल्ह्यातील २०२३ च्या खरीप हंगामात कमी पावसामुळे अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तीन पिकांसाठी विमा कंपन्यांनी मदत दिली; पण आता केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीनेच अग्रिम फेटाळलाय. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यातच पीक विम्याची रक्कम कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. यातूनच लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ, तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके, तसेच फळबागांसाठी ही विमा योजना आहे. त्यातच गेल्यावर्षीपासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देऊ केला आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. त्यातच जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते, तसेच खरीप हंगामात पावसाचा सलग २१ दिवसांचा खंड पडलेला.
यामुळे जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र ठरली होती. या मंडलांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनीही पीक विमा कंपन्यांबरोबर बैठक घेऊन सूचना केली होती. त्यानंतर आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ६३ मंडलांतील तीन पिकांसाठी २५ टक्के अग्रिम देण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी आणि नाचणी पिकांचा समावेश आहे; पण खरिपातील इतर पिकांसाठी अग्रिम मिळालाच नाही. त्यातच आता केंद्रीय तांत्रिक सल्लगार समितीने अग्रिम फेटाळल्याने पीक कापणी प्रयोगावरच विमा रक्कम ठरणार आहे.
अग्रिमसाठी पावणेदोन लाख शेतकरी..जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलांत सलग २१ किंवा त्याहून अधिक दिवस पावसाचा खंड पडलेला. त्यामुळे नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याची शक्यता होती. जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७३ हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरणार होते; पण विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पातळीवरही बैठक झाली होती.
९ पिकांसाठी होती विमा योजना
जिल्ह्यात खरीप हंगामात विमा कंपन्यांनी ९ पिकांसाठी योजना राबविली होती. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा या पिकांचा समावेश होता. यातील बाजरी, भात आणि नाचणीसाठीच अग्रिम दिलेला आहे.
आतापर्यंत साडेतीन कोटी मिळालेजिल्ह्यातील अग्रिमसाठी आतापर्यंत तीन पिकांना साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत, तर बाजरी पीक घेतलेल्या आणि अग्रिमसाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडलांतील शेतकऱ्यांनाच सुमारे तीन कोटी मिळालेत. यातून १३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे.
२०२३ च्या खरीप हंगामातील अग्रिम केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे. आता पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीक कापणी प्रयोगाचे संकलन कृषी आयुक्त पातळीवर पाठविण्यात आले आहे. त्यानंतर विमा कंपन्यांकडे अहवाल गेल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. -भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी