- प्रगती जाधव-पाटील सातारा - मनुष्याला प्राणवायु देण्याबरोबरच तळपत्या उन्हात सावली देण्याचं काम करणाऱ्या झाडांच्या जीवावरच काही अपप्रवृत्ती उठली आहे. इतके दिवस दुकानांच्या समोर अडथळा ठरणाऱ्या झाडांचा जीव घेणाऱ्या प्रवृत्तीचे धाडस आता वाढले आहे. या प्रवृत्तीने चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाडचं जाळण्याचा प्रयत्न केलाय. प्रसंगावधान राखत पालिकेशी संपर्क साधून पाणी मारून झाडा भोवती लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पण झाड जाळण्याची वृत्ती चक्क प्रशासनाच्या दारी पोहोचल्याचा संतापही व्यक्त केला जात आहे.
उन्हाळ्याची सुरूवात झाली की जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण जसे वाढतेय तसेच झाडांना ठार मारण्याचेही प्रकार वाढीस लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राजपथावर एका बड्या व्यावसायिकाने दुकानासमोरील झाड तोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला विरोध करत हरित सातारा या पर्यावरण ग्रुपने निदर्शने केल्यानंतर हे झाड वाचविण्यात यश आले. तर झाडाची साल काढून झाड झाळल्याचा ठपका ठेवुन पालिकेने एका व्यावसायिकाला कारणे दाखवा नोटीसही धाडली. त्यानंतर महाविद्यालयासमोर असलेल्या झाडावर चक्क अॅसिड प्रयोग करण्यात आला. ते झाड पर्यावरणप्रेमींनी वाचवून त्याची काळजी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपासून हे झाड मारण्याचे प्रकार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वीही पालिकेने बुंध्याला लागलेली आग विजवली होती. त्यानंतर पुन्हा अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना समोरचे झाडच जाळण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
१. झाड जाळायला चक्क पाला पाचोळाअप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेर गेल्या अनेक दशकांपासून सावलीचे साम्राज्य उभे करणारी वडाची झाडे आहेत. मोठा बुंदा आणि डेरेदार असलेल्या या झाडाचा विस्तार पन्नास फुटांपेक्षा अधिकचा आहे. स्वच्छता कर्मचारी रोज या झाडांची गळलेली पाने त्याच्या बुंद्याखाली गोळा करून ठेवतात. गोळा केलेल्या या पाचोळ्यालाच कोणा अज्ञाताो आग लावुन झाड जाळण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळावर आढळून आले.