सातारा : खरं तर रस्त्यात सापडलेला लाखो रुपयांचा ऐवज परत करणारे प्रामाणिक लोकही आपल्या समाजात आपण पाहात असतो. अशा प्रकारे एकीकडे त्यांच्या प्रामाणिकपणाचे किस्से आपण ऐकत असताना दुसरीकडे मात्र, सापडलेल्या वस्तू मोहापायी काहीजण परत करत नाहीत. हेच काहींच्या मग अंगलट येते. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून, काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या बापलेकावर जेव्हा मोहापायी चोरीचा डाग लागतो. तेव्हा त्या कुटुंबाची कशी वाताहत होते. हे विदारक चित्र नुकतेच समोर आलंय.प्रवासामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये अनेकांच्या महागड्या वस्तू गहाळ होत असतात. अशा वस्तू सापडल्यानंतर काहीजण प्रामाणिकपणे त्या वस्तू पोलीस ठाण्यात परत करतात किंवा काहीजण स्वत:हून माहिती काढत आपल्याला सापडलेल्या माैल्यवान वस्तू ज्याच्या त्याला परत करतात. परंतु, समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांना अशी एखादी माैल्यवान वस्तू सापडल्यानंतर मोह सुटतो. त्या वस्तू विकून असे लोक माैज करतात. पण देगाव फाट्यावर राहणाऱ्या बापलेकाच्या बाबतीत जरा भलतंच घडलंय.
साठी ओलांडलेले ते गृहस्थ क्रीडा संकुल परिसरातील एका ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना एका ठिकाणी बॅग सापडली. ती बॅग त्यांनी उघडून पाहिली असता त्यामध्ये दागिने, मोबाइल, पेनड्राइव्ह अशा बऱ्याच वस्तू होत्या. कोणालाही न दाखविता त्यांनी गुपचूप ही बॅग सायंकाळी कामावरून जाताना घरी नेली. घरी गेल्यानंतर आपल्या ३० वर्षांच्या मुलाला त्यांनी ही बॅग दाखविली. बॅगेतील मोबाइल, पेनड्राइव्ह पाहून मुलाला फार आनंद झाला. तर बाप उरली सुरली देणी देऊन उरलेले पैसे संसारात वापरण्याची स्वप्न पाहू लागला.
आठवडाभर घरात दागिन्यांची बॅग तशीच त्यांनी ठेवली. त्यानंतर देगाव फाट्यावरील एका सराफाकडे जाऊन त्यांनी हे दागिने विकले. या सराफाने त्या दागिन्यांची लगड केली. त्या बदल्यात काही पैसे त्या बापाने घेतले. परिस्थिती नसतानाही मुलाच्या हातात महागडा मोबाइल होता. सामाजिक प्रतिष्ठा सांभाळून हे कुटुंबीय आपल्या संसाराचा गाडा पुढे हाकत होते. मात्र, भविष्यात या मोहाची किंमत आपल्याला भोगायला लागेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.