कऱ्हाड : ‘देशात सगळीकडे महागाई वाढली आहे. उन्हाच्या झळांबरोबर महागाईच्या झळा सर्वांना सहन कराव्या लागत आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या परदेश दौऱ्यावर असताना ‘भारतात महागाई नाही,’ असे माध्यमांना सांगत असतील तर केंद्र सरकार वास्तवापासून किती दूर आहे, याचे प्रत्यंतर येते,’ अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी कऱ्हाड दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, सारंग पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सत्यजित पाटणकर, जयंत पाटील, सौरभ पाटील, जयंत बेडेकर, नंदकुमार बटाणे, प्रमोद शिंदे, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘देशामध्ये महागाईचा प्रश्न मोठा आहे. माझ्यावर अनेक सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या अनावश्यक मुद्द्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही.’ अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाबाबत छेडले असता याबाबत राष्ट्रवादीची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. त्यामुळे मी वेगळे बोलण्याची गरज नाही. असे सांगण्यातच त्यांनी धन्यता मानली.
गुणरत्न सदावर्ते हे पवार कुटुंबावर सातत्याने टीका करीत आहेत, याकडे लक्ष वेधले असता सुळे म्हणाल्या, ‘काही लोकांचा तसा स्वभाव असतो. दुसरे संस्कार असतात. आमच्यावर मात्र दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, त्यामुळे अशा टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही.’
ईडी नव्हे इन्कम टॅक्स नोटीस
सदानंद सुळे यांना ईडीची नोटीस आली आहे काय? याबाबत विचारताच ‘ईडीची नव्हे तर इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. उगाच गैरसमज करून घेऊ नका,’ असे सांगत आलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले.
ते दुप्पट वेगाने काम करतील
माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे अन्याय होत आहे. याकडे लक्ष वेधले असता शशिकांत शिंदे, शरद पवार यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी ते दुप्पट वेगाने काम करतील, असे त्यांनी सांगितले.