लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : गोवा येथून मुंबईला येणाऱ्या तरुणीचा प्रवासातच मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सातारा येथेच ती निपचित पडलेली असतानाही ट्रॅव्हल्सचालकांनी तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास नकार दिला. परिणामी, मृत तरुणीचा सातारा ते नेरूळ असा प्रवास झाला.
तमिना आलीम (२२) असे मृत तरुणीचे नाव असून ती गोव्यातील एका बारमध्ये काम करते. तिचे कुटुंबीय मालाडला राहायला आहेत. शुक्रवारी गोव्यात तिच्या दुचाकीचा अपघात झाला होता. यामुळे आईने तिला मुंबईला बोलावून घेतले होते. त्यामुळे शनिवारी रात्री ती गोव्यावरून मालाडला येण्यासाठी आत्माराम ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होती. यावेळी सोबत तिचा एक मित्रदेखील होता. रविवारी सकाळी ही ट्रॅव्हल्स सातारा येथे पोहोचली असता तमिना ही निपचित पडल्याचे आढळून आले, तर ट्रॅव्हल्सचा कर्मचारी तिला सीपीआर देत असल्याचे मित्राच्या निदर्शनास आले. यामुळे त्याने तत्काळ जवळच्या रुग्णालयात तिला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, ट्रॅव्हल्सच्या चालकाने बस न थांबवता मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केल्याचा आरोप तमिनाच्या मित्राने केला आहे. नेरूळमध्ये बस आली असता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. रुग्णालयात दाखल केले असता तिला मृत घोषित केले.
मृत्यूमागे नेमके कारण काय?शवविच्छेदनात डोक्यावर झालेल्या दुखापतीमध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस तानाजी भगत यांनी सांगितले. मात्र, तिच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे का? शिवाय कोणाच्या हलगर्जीमुळे तिचा मृत्यू झाला, हेदेखील तपासले जाणार असल्याचे भगत यांनी सांगितले. दरम्यान, ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांनी वेळीच तिला रुग्णालयात दाखल केले असते, तर तिचे प्राणदेखील वाचू शकले असते.