सातारा : सतत मोबाइलमध्ये डाेकं घालणं अतिरेक समजलं जातं. मात्र, उशिरा मोबाइल पाहणं हे सुद्धा पश्चात्तापाचे कारण ठरू शकतं, असा कोणी विचारही करणार नाही. परंतु असाच काहीसा प्रकार साताऱ्यातील एका मुलाच्या बाबतीत घडलाय. वडिलांनी रात्री आठ वाजता मुलाच्या व्हॉटसॲपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविला. मात्र, नेट बंद केल्यामुळे तो मेसेज वेळेवर पाहू शकला नाही. दोन तासांनंतर जेव्हा मुलाने मेसेज पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली; परंतु तोपर्यंत फार वेळ झाला होता. त्याच्या वडिलांनी या जगाचा केव्हाच निरोप घेतला होता.संदीप जाधव (वय ५५, रा. सदर बझार सातारा) यांनी दीड वर्षापूर्वी महेश या मुलाला दत्तक घेतले होते. ते एकटेच राहत असल्याने ते महेशच्या घरातून डबा घेऊन जात होते. काैटुंबिक ताणतणावात ते नेहमी वावरत होते. मंगळवारी दुपारी दत्तकपुत्र महेश याला त्यांनी बोलावून घेतले. ‘मला चायनीज खायचे आहे.’ असं सांगून ते त्याला वायसी काॅलेज परिसरात घेऊन गेले. दोघांनी चायनीज खाल्ल्यानंतर पुन्हा त्यांनी मला राजवाडा परिसरात फिरायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना दत्तक मुलाने राजवाडा परिसरात दुचाकीवरून नेले. तेथे काहीवेळ फिरल्यानंतर पुन्हा दोघेजण गोडोलीत गेले. ‘मी सदर बझारला जातो,’ असे सांगून संदीप जाधव निघून गेले. मात्र, काही वेळात परत दत्तक मुलगा राहत असलेल्या इमारतीजवळ आले. चाैथ्या मजल्यावर जाऊन त्यांनी थेट खाली उडी मारून आत्महत्या केली. मुलगा महेश याने खाली येऊन पाहिले असता वडिलांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. १०८ रुग्ण वाहिकेवरील डाॅक्टरांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संदीप जाधव यांना तपासले असता ते मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री बारापर्यंत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री महेश घरी आल्यानंतर मोबाइलचे नेट त्याने सुरू केले. त्यावेळी वडील संदीप जाधव यांनी आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे त्याला दिसले. हा मेसेज लवकर पाहिला असता तर कदाचित वडिलांचा जीव वाचला असता. मोबाइलचे नेट बंद ठेवल्याचा पश्चात्ताप वाटत असल्याचे मुलाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलिस करणार कसून तपास..संदीप जाधव यांनी कोणाच्या त्रासामुळे आत्महत्या केली. नेमकी कशी केली. टेरेसवर जाताना त्यांना कोणी पाहिले आहे का, आदी कारणांबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिस कसून तपासणी करणार आहेत. त्यानंतरच या प्रकरणातील आणखी विस्तृत माहिती समोर येणार आहे.