मलकापूर : वाटेगावहून सातारच्या दिशेने निघालेल्या चालत्या कारला अचानक आग लागल्याने मलकापूरात महामार्गावर द बर्निंग कारचा थरार झाला. वनवासमाची ता. कराड गावच्या हद्दीत आज, गुरूवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कारचा समोरील भाग जळून खाक झाला. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे जीव वाचल्याने सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील चौघे कामानिमित्त वाटेगांवहून सातारच्या दिशेने जात होते. पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वनवासमाची ता. कराड गावच्या हद्दीत आले असता कारचा पुढील टायर फुटल्याने कार दुभाजकाला धडकून दुभाजकातील झाडात शिरली. तोपर्यंत कारच्या पुढील भागातून ज्वालासह धुराचे लोट बाहेर पडत होते.कार पेटल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजली. जवळच असलेल्या विटभट्टीवरील कामगारांसह नागरिकांनी व महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खूणे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखत कारमधील चौघांना सुखरूप बाहेर काढले. तोपर्यंत काहीजणांनी कटावणीने बॉनेट उघडताच जाळाचे लोळ बाहेर पडले. तर काही नागरिकांनी बादलीने पाणी आणून आग विझवली. काही मिनिटातच नागरिकांना आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत कारचा समोरील भाग जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पुणे-बंगळूरु महामार्गावर 'द बर्निंग कार'चा थरार, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे चौघांचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 1:11 PM