सातारा : लहान मुलांना खेळण्यातील कोणत्याही वस्तूंचे प्रचंड आकर्षण असते. अशा वस्तू मिळण्यासाठी मुले आपल्या आई-वडिलांकडे हट्ट धरतात. परंतु, जर हवी ती वस्तू मिळाली नाही तर मग अशी काही हट्टी मुले वाट्टेल ते करायला मागे-पुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला. घरची हलाखीची परिस्थिती. म्हणून सहावीतल्या मुलाने सायकल चालविण्याची हाैस चक्क चोरी करून भागवली; पण कोवळ्या वयात त्याने केलेला हा गुन्हा त्याच्या पालकांना विचार करायला लावून गेला.जिल्हा परिषदेसमोर एक खासगी क्लास आहे. या क्लासच्या पार्किंगमधून काही दिवसांपूर्वी सुमारे ३५ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक सायकल चोरीस गेली होती. याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली होती. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या इलेक्ट्रिक सायकल चोरीचा तपास करत होते. क्लास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर एक लहान मुलगा सायकल चोरून नेत असताना दिसून आला.पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर १२ वर्षांच्या मुलाने चोरी केल्याचे समोर आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या आई-वडिलांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. ‘तू सायकल चोरली आहेस का,’ अशी पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र, त्याने नकार दिला. सीसीटीव्हीत दिसत असतानाही तो धडधडीत आई-वडिलांसमोर खोटे बोलत होता. याचे कारण आई-वडील रागावतील, याची त्याला भीती वाटत होती. अखेर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सायकल चोरीबाबत पुन्हा विचारले असता त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. ‘मला घरातल्यांनी सायकल घेऊन दिली आहे. परंतु, माझ्याकडे इलेक्ट्रिक सायकल नाही. त्यामुळे मी ही इलेक्ट्रिक सायकल चोरली असल्याचे त्याने कबूल केले. ‘सायकल घरी आणली तर आई -वडील विचारतील, एवढी महागडी सायकल तू आणलीस कोठून,’ त्यामुळे सायकल घरी आणत नव्हतो. शाळा सुटल्यानंतर परिसरात तो इलेक्ट्रिक सायकलवरून फेरफटका मारायचा. त्यानंतर घराच्या परिसरातील झाडीत सायकल लपवून ठेवून तो घरी यायचा.आपला मुलगा चोरी करू शकतो, यावर आई-वडिलांचा बराचवेळ विश्वास बसला नाही. आमच्या परिस्थितीनुसार त्याला सायकल घेऊन दिली. मात्र, इलेक्ट्रिक सायकल घेऊन देण्याची आमची ऐपत नाही. आम्हीच मुलाला घडविण्यात कमी पडलो, अशी खंतही त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखवली.
आपल्या मुलांशी पालकांनी मैत्री करावी. त्यांच्या मनातील भाव जाणून घ्यावेत. मुलांशी प्रेमाने वागल्यास कोवळ्या वयात घडणारे अनुचित प्रकार रोखले जातील. मुलांशी सातत्याने संवाद आवश्यक आहे. -राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक, सातारा शहर