सातारा : उन्हाळा असो किंवा पावसाळा नागरिकांची कायमच पाण्यासाठी ओरड सुरू असते; परंतु ही परिस्थिती बदलून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, असे कोणालाही वाटत नाही. सातारा शहराचा विचार केल्यास केवळ मुठभर नागरिकांनीच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकारून पाणीबचत सुरू केली आहे. तर बहुतांश नागरिक पालिका व जीवन प्राधिकरणवरच अवलंबून आहेत.एखादा गृहप्रकल्प साकारताना पालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जाते. त्याशिवाय बांधकाम पूर्ण झाल्याचा परवाना दिला जात नाही. मात्र, अनेकजण या नियमांकडे दुर्लक्ष करून टोलेजंग इमारती उभ्या करतात. परंतु, पाणी बचतीसाठी प्रयत्न करीत नाहीत. शहरातील किती इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे, याची नोंदही पालिकेत नाही. प्रशासनाने किमान नव्याने साकारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांना रेन वॉटरची सक्ती करावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
असे केले जाते जलपुनर्भरण
पावसाच्या पाण्याची पुनर्वापरासाठी साठवण करणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. पावसाचे पाणी घराच्या छतावरून जमिनीखालच्या टाकीमध्ये संकलित केले जाते. काही ठिकाणी हे पाणी खोल खड्यात, विहिरीत, बोअरवेल, जलाशयात सोडले जाते. हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असले तरी त्याचा गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
...तर टंचाईतून सुटकासातारा शहराचा विचार केल्यास शहराचे पर्जन्यमान समाधानकार आहे. पडणाऱ्या पावसाने पाणी ओढे, नाले गटारातून पुढे नदीलाच मिळते. त्याची कोठेही साठवणूक करता येत नाही. जर नागरिकांनी वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केल्यास पाणीटंचाईच्या संकटातून त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
जलपुनर्भरणाचे हे आहेत फायदे
- पावसाचे पाणी साठवून ठेवल्यास त्याचा विविध कामांसाठी पुनर्वापर करता येतो.
- जमिनीत खोल खड्डा खोदून अथवा बोअरवेलमध्ये जर हे पाणी सोडले तर पृष्ठभागाखालील जलसाठ्यात वाढ होते.
- परिणामी बोअरवेल, विहिरींची पाणीपातळी रखरखत्या उन्हातही टिकून राहते. वृक्षांना नैसर्गिकरीत्या जमिनीतून पाणी मिळते.
- स्वत:साठी लागणाऱ्या पाण्याची स्वत:च बचत केली तर उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासत नाही.
पाच वर्षांतील बांधकाम परवाने२०१८ - १५५२०१९ - २०२२०२० - १९८२०२१ - ४७९२०२२ - ३१०२०२३ - १२४
- शहराची लोकसंख्या : १,८०,५४०
- पाणीयोजना : २
- रोजचा पाणीपुरवठा : पालिका : १३ लाख लिटर
- प्राधिकरण : २७ लाख लिटर