कऱ्हाड : येथील पालिकेत नगराध्यक्षांच्या कक्षाला बाहेरून कुलूप लावून पालिकेच्या शिपायाला कोंडून ठेवल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत साधी कैद आणि प्रत्येकी ५ हजार २०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्या. अण्णासाहेब पाटील यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली.सतीश विष्णू पाटील, सुहास शामराव पाटील, महेशकुमार शिवाजी शिंदे व नीतीराज रामचंद्र जाधव (सर्वजण रा. कऱ्हाड ) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रहार संघटनेचे सतीश पाटील, सुहास पाटील, महेशकुमार शिंदे व नीतीराज जाधव यांनी नगराध्यक्षांच्या कक्षाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. यावेळी पालिकेचे शिपाई यशवंत महादेव साळुंखे हे कक्षामध्ये अडकले. कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून ठेवत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी कºहाड शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अॅड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. त्यामधील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ए. पी. बाबर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्ष आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने चारही आरोपींना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद, प्रत्येकी ५ हजार २०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन आठवडे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
Satara: नगराध्यक्षांच्या कक्षाला टाळे ठोकणे भोवले; ‘प्रहार’च्या चौघांना शिक्षा; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल
By संजय पाटील | Published: June 25, 2024 6:08 PM