मुराद पटेलशिरवळ : पुणे येथील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचे २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसाठी अपहरण करत खून करुन त्यांचा मृतदेह सातारा-पुणे जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या सारोळा पुलावरून नीरा नदीच्या पात्रात टाकला होता. महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टिम व शिरवळ रेस्क्यू टिमला १७ दिवसांनी मृतदेह शोधण्यात यश आले. पोत्यात बांधलेला सडलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. निलेश दत्तात्रय वरघडे (वय ४३, रा. सुप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी,पुणे) असे या प्रसिद्ध वास्तूतज्ञांचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील बिबवेवाडी येथील निलेश वरघडे हे पुण्यासह सोलापूर, पुणे ग्रामीण याठिकाणी वास्तूतज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. निलेश वरघडे यांच्याकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणारा दिपक जयकुमार नरळे (वय २९, रा.नऱ्हे, पुणे) हा चालक होता. रविवार (दि.१६ ऑक्टोबर) रोजी निलेश वरघडे हे घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला ते बेपत्ता व अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती.याप्रकरणी तपास करीत असताना पोलिसांना निलेश हे दिपक याच्याबरोबर दिसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बिबवेवाडी पोलीसांनी दिपकच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत दिपकने निलेश यांना मित्र रणजित ज्ञानदेव जगदाळे (वय २९, सध्या रा.पनवेल) याच्या साहाय्याने मेडिकलची वास्तू बघण्याच्या बहाण्याने कारमधून बोलावत कॉफीमधून झोपेच्या मोठया प्रमाणात मात्रा देत दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याचे सांगितले.खून करुन त्याच्या अंगावरील साधारणपणे २५ तोळे सोन्याचे दागिने काढून घेत त्यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रामध्ये टाकला. गेल्या ८ दिवसापासून महाबळेश्वर ट्रेकर्स, कोलाड, रायगड येथील वाईल्ड वेस्टअँडव्हेंचर्स, शिरवळ रेस्क्यू टिम, स्थानिक मच्छिमार, आपत्ती व्यवस्थापन संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने युद्धपातळीवर मृतदेहाची शोधमोहीम सुरु होती. अखेर १७ दिवसानंतर मृतदेह हाती लागला.
अपहरण झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञाचा १७ दिवसांनी हाती लागला मृतदेह, नीरा नदीपात्रात सुरु होती शोधमोहिम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 7:37 PM