कऱ्हाड: ऐन दिवाळीच्या तोंडावर कऱ्हाड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांना धक्का बसला आहे. ही पतसंस्था गेली काही दिवस बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेचे ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी शुक्रवारी कराड शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत.'शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवहार ठप्प; ठेवीदार अस्वस्थ' अशी बातमी लोकमत'ने प्रसिद्ध केली. त्यामुळे जे लोक या प्रकारापासून अनभिज्ञ होते तेही जागे झाले. सकाळी ११ च्या सुमारास कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये सभासद, ठेवीदार यांनी मोठी गर्दी केली होती. त्या सर्वांनी आमच्या ठेवी परत द्यायला टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करावी अशा तक्रारी दाखल केल्या.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.गेल्या काही दिवसापासून या पतसंस्थेबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असतानाच ही पतसंस्था १० दिवसापासून बंद असल्याने सभासद व ठेवीदारांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही संस्था व संस्थेचे व्यवहार ठप्प असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी उपनिबंधकांकडे धाव घेत ठेवी परत मिळण्याबाबत निवेदन दिले आहे.दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदार व सभासदांची नुकतीच एक मीटिंग घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने सभासद ठेवीदार उपस्थित होते. या सर्वांनी संस्थे विरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज पतसंस्थेचे ठेवीदार, सभासद मोठ्या संख्येने कऱ्हाड शहर पोलीस स्टेशनला एकत्र येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना भेटले. शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेची चौकशी करून सर्व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत अशी त्यांनी मागणी केली.यावेळी उदय हिंगमिरे, शाहिबाज आगा, गौतम करपे, दत्तात्रय तारळेकर, दिलीप पाटील, राजीव खलिपे, सुनील महाजन, राजेंद्र भादुले आदीसह महिला ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कऱ्हाडमधील 'शिवशंकर' पतसंस्थेच्या ठेवीदारांची पोलिसांकडे तक्रार, लोकमत'च्या बातमीमुळे सभासद झाले जागे
By प्रमोद सुकरे | Published: October 21, 2022 4:01 PM