सातारा : राज्य शासनाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी संवर्गातील बदली आदेश काढले असून अडीच महिन्यानंतर सातारा जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पूर्णवेळ प्रकल्प संचालक मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील एका गटविकास अधिकाऱ्याची बदली झाली असून तिघांची रिक्त जागी नियुक्त करण्यात आली आहे.राज्य शासनाने सोमवारी महाराष्ट्र विकास सेवा गट - अ मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली केली. यामध्ये सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालकपदी एस. ए. हराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात हराळे हे सहाया आयुक्त (तपासणी) म्हणून कार्यरत होते. ग्रामीण विकासच्या प्रकल्प संचालक चंचल पाटील यांची एप्रिल महिन्यात बदली झाली होती. त्यानंतर हे पद रिक्त राहिले होते. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्याकडे प्रभारी पदभार सोपिवण्यात आलेला. आता ग्रामीण विकासला पूर्णवेळ प्रकल्प संचालक मिळणार आहे.माण गटविकास अधिकारी पद बदलीने रिक्त होते. आता या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फलटणचेही गटविकास अधिकारीपद रिक्त होते. आता या जागी चंद्रकांत बोडरे यांची बदली झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे ते गटविकास अधिकारीपदी कार्यरत होते. तर माणचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांची विनंतीने खटाव गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जावळी गटविकास अधिकारी पद रिक्त होते. आता या जागी मनोज भोसले यांची शासनाने नियुक्ती केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे भोसले हे गटविकास अधिकारी होते.
आणखी तीन पदे रिक्त...जिल्हा परिषदेतील वरिष्ठांची आणखी तीन पदे रिक्त आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाला सहा महिन्यांपासून पूर्णवेळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिळालेला नाही. तर जिल्हा आरोग्य अधिकारीपदाचा कार्यभार आठ महिन्यांपासून प्रभारींकडे आहे. तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदीही चार महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नाही.