सातारा : चालकाने नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने सुरुवातीला दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे कारची एअर बॅग उघडली गेली. मात्र, उघडलेल्या एअर बॅगमुळे चालकाला समोरचे काहीच दिसले नाही. परिणामी, चालत निघालेल्या दोन महिलांच्या अंगावर कार गेली. त्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. हा अपघात चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे रविवारी सायंकाळी पाच वाजता झाला.उषा भारत पोळ (वय ४२, रा. बंगली पिंपळा, ता. गेवराई, जि. बीड) असे अपघातातमृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.दत्तात्रय बाबूराव भोसले (४६, रा. जुनी वडाळवाडी, माॅडर्न काॅलनी, शिवाजीनगर, पुणे) हे कार घेऊन रहिमतपूरहून साताऱ्याकडे येत होते. चिंचणेर वंदन गावच्या हद्दीत आल्यानंतर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. समोर चाललेल्या एका दुचाकीस्वाराला कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे कारची एअर बॅग उघडली गेली; परंतु डोळ्यांसमोर एअर बॅग आल्याने पुढचे काही चालकाला दिसले नाही.याचवेळी रस्त्यावरून उषा पोळ आणि अन्य एक १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी चालत जात होत्या. या दोघींना कारने धडक दिली. त्यात उषा पोळ या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर या अपघातात दुचाकीवरील दोघांसह एक मुलगी जखमी झाली.
Satara: कार दुचाकीला धडकली, एअर बॅग उघडली; चालक वाचला; पण बीडच्या महिलेने जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 1:47 PM