Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या
By नितीन काळेल | Published: January 16, 2024 12:20 PM2024-01-16T12:20:08+5:302024-01-16T12:22:26+5:30
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये ...
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कऱ्हाड, फलटण आणि पाटण तालुकाध्यक्षांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाची बैठक जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवाजीराव महाडिक (कोरेगाव), प्रमोद शिंदे (वाई), दत्तानाना ढमाळ (खंडाळा), नंदकुमार मोरे (खटाव), बाबुराव सपकाळ (महाबळेश्वर), जितेंद्र डुबल (कऱ्हाड), जयकुमार इंगळे (फलटण), सागर पाटील (पाटण) यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संजीवराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार मकरंद पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या मान्यतेने जिल्ह्यात पक्ष संघटना बळकटीसाठी तसेच पक्ष विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.
कार्याध्यक्ष अमित कदम म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एकचा करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुका कार्यकारणीच्या निवडी लवकरात लवकर करून येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागावे. तसेच पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावेत. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती संजय देसाई, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कांतीलाल पवार, राजेंद्र घाडगे, राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.