सातारा : सातारा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर माजी नगराध्यक्षांच्या माध्यमातून करण्यात आलेले अतिक्रमण सोमवारी दुपारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आले. प्रशासनाने या कारवाईबाबत दाखविलेल्या तत्परतेचे नागरिकांमधून कौतुक करण्यात आले.पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाणी साठवण टाकी आहे. या टाकीच्या समोर असलेली मोकळी जागा पालिकेच्या मालकीची असून, याठिकाणी सातत्याने टपऱ्या व हातगाड्या थाटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पालिकेने तो वेळोवेळी हाणून पाडला. मात्र, रविवारी रात्री एका माजी नगराध्यक्षांनी केलेल्या कारनाम्याने प्रशासनाची झोपच उडाली. त्यांच्या वरदहस्ताने या मोकळ्या जागेवर चायनीज हॉटेलच्या प्रयोजनाने अतिक्रमण करण्यात आले. सिमेंटचा कोबा करुन त्यावर बांबूचे भले मोठे शेड उभारण्यात आले. एका रात्रीत झालेले हे बांधकाम पाहून सोमवारी सकाळी सजग नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला.या अतिक्रमणाची माहिती मिळताच प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी संबंधित अतिक्रमण हटविण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार सोमवारी दुपारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबीच्या साह्याने पालिका समोरील अतिक्रमण जमिनदोस्त केले. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांचे अतिक्रमण उद्ध्वस्त, पालिकेची कारवाई
By सचिन काकडे | Published: June 03, 2024 7:21 PM