दशरथ ननावरे खंडाळा : निसर्गभ्रमंती आणि पशुपक्षांचे दर्शन ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. खंडाळा तालुक्यातील प्रसिद्ध वीर धरण पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. या धरण परिसरात सध्या विविध रंगीबेरंगी आकर्षक पक्षांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना भुरळ पडत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वीर धरण परिसर हा स्थानिक पर्यटकांसाठी व निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण आहे. दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत बरेच स्थलांतरित पक्षी येथे येत असतात. येथील जलाशयाचा आनंद घेण्याबरोबरच या आकर्षक पक्षांचे याची डोळा दर्शन घ्यावे, यासाठी अनेक पर्यटक आपला वेळ येथे घालवतात. सध्या या परिसरात काळा अवाक, काळ्या पंखांचा स्टिल्ट, पांढऱ्या मानेचा करकोचा, राखाडी बगळा, भारतीय करढोक इत्यादी पक्षी पहायला मिळत आहेत. जलाशयातील, माळरानावरील आणि जंगलात अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी मुक्कामास येतात. जलाशयातील पक्षी नजरेस चटकन दिसत असल्याने, पाणवठ्यांवरील या पाहुण्यांचे संमेलन पाहायला शेकडो लोक येतात.
वीर धरणावर फेरफटका मारताना जलाशयाच्या आजूबाजूला अनेक पक्षी पहायला मिळतात. त्यांचे छायाचित्रे काढणे हा मोठा आनंद असतो. एकाचवेळी विविध पक्षी पहायला मिळणे पक्षीमित्रांसाठी पर्वणी असते. - अजित वेणुपुरे, निसर्गप्रेमी