सातारा : करिअरच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बारावी परिक्षेचा पहिला पेपर विनाविघ्न पार पडला. वेळेपूर्वी परिक्षा केंद्रांवर दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडायला पालकांची मोठी गर्दी झाली होती. परिक्षा काळात दहा मिनिटे जादा मिळाल्याने मुलांना याचा फायदाही झाला. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरणात पेपर सोडवता यावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्र पासून शंभर मीटरच्या अंतरात प्रवेश बंदीचे आदेशही लागू करण्यात आले होते. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर सज्ज असलेल्या यंत्रणेच्या देखरेखीखाली बारावीच्या परीक्षेला झाली आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३८ हजार विद्यार्थी बसले. जिल्ह्यातील बारावीची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन परीक्षा केंद्र सज्ज केली आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी यासाठी सर्व केंद्रांवरील सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली आहे.भरारी पथक यांचीही नेमणूकपरीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रनिहाय भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, महिला अधिकारी आणि बोर्ड पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचाही पथकात समावेश आहे.
इलेक्ट्राॅनिक गॅझेटवर बंदीफसवणुक मुक्त परीक्षा मोहिमेवर भर देऊन निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कडक व्यवस्था केली आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लूटूथ उपकरणे आणि स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे. याशिवाय परीक्षा शिफ्ट संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही.
पालकांना धास्ती मुलांची मस्तीबारावी परिक्षेच्या पहिल्या दिवशी खुप दिवसांनी मित्र मैत्रीणी भेटल्यामुळे त्यांच्यात गप्पांचा माहोल होता. या उलट परिक्षा केंद्राबाहेर मुलांना सोडून गेलेल्या पालकांना मात्र पेपर कसा असेल? वेळ पुरेल का? नक्की अभ्यास झालाय का? यासारखे प्रश्न सतावत होते. त्यामुळे परिक्षा केंद्राबाहेर पालकांच्या चेहऱ्यावरची धास्ती आणि केंद्रात मुलांची मस्ती असा माहोल पहायला मिळाला.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा शांततेच्या आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेचा पहिला दिवस विनाविघ्न पार पडला आहे. शेवटच्या पेपरपर्यंत यंत्रणा कटाक्षाने सुरळीत परिक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक