कऱ्हाड : वनवासमाची, ता. कऱ्हाड येथे उसाच्या फडात आढळलेल्या तिन्ही बछड्यांना मादी बिबट्याने आपल्या सोबत नेले. वन विभागाच्या प्रयत्नामुळे तसेच ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मादी बिबट्याची तिच्या बछड्यांशी पुनर्भेट झाली. हा पुनर्भेटीचा क्षण वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैदही झाला.कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची येथे जयवंत यादव यांच्या माळ नावाच्या शिवारात सोमवारी दुपारी ऊसतोड सुरू असताना मजुरांना बिबट्याची तीन बछडी आढळून आली. मजुरांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला कळविले. माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, श्रीनाथ चव्हाण, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक दीपाली अवघडे, अरविंद जाधव, सचिन खंडागळे, अभिजीत शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. तसेच परिसर निर्मनुष्य केला.बछड्यांना एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे मादी बिबट्याने तेथून एका बछड्याला नेले. तर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या बछड्यालाही मादी तेथून घेऊन गेली. कॅरेटमध्ये एकच बछडा राहिला असताना पुन्हा एका तासाने मादी बिबट्याने तेथे येऊन तिसऱ्या बछड्यालाही जबड्यात पकडून तेथून नेले. यादरम्यान अनिल कांबळे, शंभूराज माने, योगेश बडेकर, हणमंत मिठारे या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
वन विभागाने घडवली मादी बिबट्या अन् बछड्यांची पुनर्भेट, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 5:22 PM