प्रवीण जाधवपाटण : पाटण तालुक्यातील केरळ येथील पाणी व भक्ष्याच्या शोधात आलेल्या सुमारे दोन ते अडीच वर्षांची मादी जातीच्या बिबट्याला पाटणच्या वनाधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आल्याची माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत पोतदार यांनी दिली.सेल्फीसाठी युवकांनी बिबट्याला घेराव घालत बिबट्याचा छळ केल्याप्रकरणी गोविंद जगन्नाथ जाधव (वय ४३) याच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य तीन जणांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळवरून मिळालेली माहिती की, पाटण तालुक्यातील मणदुरे विभागातील केरळ येथे शनिवारी दुपारच्या सुमारास मानवी वस्तीतील शेतात अशक्त अवस्थेत बिबट्या ग्रामस्थांना दिसून आला. या बिबट्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिल्यानंतर पाटणचे वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत पोतदार, वनपाल वाय. एस. सावर्डेकर, वनसेवक संजय जाधव, आनंद सकट, उदय गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जाळीच्या साह्याने पकडले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला पुणे येथे हलवण्यात आले.गावात बिबट्याची माहिती पसरताच बघ्यांनी गर्दी केली होती. त्याला मदत आणि पाणी पाजतानाचा उचलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. याप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन दिवसांपूर्वीच रानगव्याने शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला केला. त्याला मात्र वनविभागाने सोडून दिले.
भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याला वनविभागाने घेतले ताब्यात, उपचारासाठी पुण्याला रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 5:04 PM