सातारा : ‘उलटी’ हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी अनेकांना किळस वाटते; पण आपण ज्या उलटीबद्दल बोलतोय ती उलटी व्हेल माशाची आहे. साताऱ्यात व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली खरी. पण आता या उलटीचे पुढे काय केले जाणार, असा नक्कीच अनेकांना प्रश्न पडला असेल. मात्र, ही उलटी नष्ट केली जाणार नसून, त्यातून शासन कोट्यवधींचा महसूल मिळविणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.रत्नागिरीहून चक्क रुग्णवाहिकेतून चाैघेजण व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करत मुंबईला निघाले होते. त्यामध्ये रत्नागिरी पोलिस दलातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही समावेश होता. सातारा एलसीबीने ही रुग्णवाहिका महामार्गावर अडविल्यानंतर संबंधित चाैघांकडून व्हेल माशाची पाच किलो उलटी जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची तब्बल पाच कोटी किंमत आहे. इतकी माैल्यवान वस्तू असताना आता या उलटीचे नेमके काय केले जाणार, असा प्रश्न साताऱ्यांनाच पडला होता. त्यामुळे ‘लोकमत’ने वनविभाग आणि पोलिसांशी संपर्क साधून यातील कायदेशीर प्रक्रिया जाणून घेतली. ज्या वस्तूचा उपयोग शरीरासाठी हानीकारक नाही. ती वस्तू जर शासन दरबारी जप्त झाली तर त्या वस्तूचा शासन लिलाव करते. त्यातून शासन महसूल मिळवते, अशी एकंदरीत कोणत्याही वस्तूबाबत लिलाव प्रक्रिया असते. याच पद्धतीने व्हेल माशाच्याही उलटीची लिलाव प्रक्रिया होणार आहे. सध्या चारीही संशयित आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. तसेच व्हेल माशाची उलटीही पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतु तपास पूर्ण झाल्यानंतर ही उलटी वनविभागाच्या ताब्यात दिली जाणार आहे. न्यायालय आणि शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वनविभाग या उलटीचा लिलाव करणार आहे. हा लिलाव झाल्यास शासनाच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा होणार आहे.
व्हेल माशाच्या उलटीचा वनविभाग करणार लिलाव, शासनास कोट्यवधींचा महसूल मिळविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:25 PM