सातारा : जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत थंडी चांगलीच जाणवत असते. यंदा मात्र, तीव्र उन्हाळा पडणार असल्याचे संकेत असून फेब्रुवारीतच सातारा शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे दुपारी चांगलेच ऊन पडत आहे, तर सध्या सकाळच्या सुमारासच कमी प्रमाणात थंडी जाणवत आहे.जिल्ह्यात नोव्हेंबरपासून थंडी पडत होती. पण, यावर्षी कडाक्याच्या थंडीशी नागरिकांना सामना करावा लागला नाही. कारण सतत तापमानात चढ-उतार सुरू होता. त्यातच जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला थंडीत वाढ झाली. त्यावेळी सातारा शहराचे एकदाच किमान तापमान १० अंशांपर्यंत खाली आले होते. दोन वर्षांतील हे नीचांकी तापमान ठरले. पण, त्यानंतर पारा वाढून १९ अंशांवर पोहोचला होता.
यंदा थंडी कमी असली तरी उन्हाळ्याला लवकरच सुरुवात झालेली आहे. कारण, फेब्रुवारी महिना उजाडल्यापासून कमाल तापमान सतत वाढत चालले आहे. सातारा शहरातील कमाल तापमान तर ३५ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे सातारकरांना दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. त्याचबरोबर उकाडाही वाढला आहे. तर सायंकाळच्या सुमारास थंडी गायब झाली आहे. त्यामुळे रात्रीही पंखे सुरू करण्याची वेळ आलेली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात माण, खटाव, फलटण तालुक्यात उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारी उन्हाची तीव्रता असते. त्यामुळे यंदा उन्हाळा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या वर्षी १५ मार्चनंतर कमाल तापमानात वाढ होत गेली होती. यंदा लवकर पारा वाढत चालल्याने उन्हाळा तीव्र असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सातारा शहरातील कमाल तापमान..दि. १ फेब्रुवारी २९.०१, दि. २ फेब्रुवारी ३०.०१, ३ फेब्रुवारी ३०.०९, ४ फेब्रुवारी ३२.०४, ५ फेब्रुवारी ३२.०७, ६ फेब्रुवारी ३३.०३, दि. ७ फेब्रुवारी ३३.०६, ८ फेब्रुवारी ३३.०५, ९ फेब्रुवारी ३४, दि. १० फेब्रुवारी ३४.०४, ११ फेब्रुवारी ३५.०२. १२ फेब्रुवारी ३५.०२.