सातारा : कऱ्हाड येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे ५२ तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. याची किंमत ३६ लाख ४० हजार रुपये आहे. रमेश महादेव कुंभार (रा. कशेळी, ता. भिंवडी, जि. ठाणे) व नीलेश शामराव गाढवे (रा. बनवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सातारा आणि कऱ्हाड पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. दि. ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत कऱ्हाड येथील शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका घरात चोरी झाली होती. अज्ञात चाेरट्यांनी घरातून सोन्याचे ३७ लाख ९४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. ही घटना उघडकीस येताच पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना तपासाच्या सूचना दिल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व कऱ्हाडच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने पोलिस पथके तयार करून तपासाची चक्रे गतिमान केली.या पथकाने घटनास्थळी वेळोवेळी भेट दिली. तसेच तांत्रिक व गोपनीय माहितीचा आधार घेत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा क्रमांक प्राप्त केला. या वाहनाची पडताळणी केली असता ते वाहन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश कुंभार याचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी वेशांतर करून सलग चार दिवस ठाणे येथील रमेश कुंभार याच्या घराजवळ पाळत ठेवली. दरम्यान, दि. ६ एप्रिल रोजी रमेश कुंभार हा सातारा बसस्थानकात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. यानंतर तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रमेश कुंभार व त्याच्या सोबत असलेल्या नीलेश गाढवे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कऱ्हाड येथील घरफोडीची कबुली दिली.त्यांच्याकडून घरफोडीतील दागिन्यांपैकी ५२ तोळे वजनाचे ३६ लाख ४० हजारांचे दागिने व एक चारचाकी वाहन, असा एकूण ४१ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या चोरट्यांनी फलटण भागात काही गुन्हे केले असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
Satara: पोलिसांनी वेशांतर करून चोरटे पकडले; अर्धा किलो सोन्याचे दागिने हस्तगत
By सचिन काकडे | Published: April 20, 2024 3:52 PM