सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला असून सायंकाळी पाचपर्यंतच्या ९ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला ६७ तर कोयनेला ३९ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर झाला. तर सातारा शहरातही अनेक दिवसानंतर पावसाला सुरूवात झाली. दुपारी तीनला सुरू झालेल्या पावसाची सायंकाळपर्यंत संततधार होती. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडणेही मुश्चील झालेले.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल झाला. मागील १५ दिवसांत पूर्व आणि पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली. सध्याही पाऊस सुरूच आहे. पण, पावसाचे प्रमाण कमी झालेले. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला. परिणामी पेरणी आणि भात लागणीला सुरुवात झाली. आतापर्यंत माण, खटाव, फलटण या तालुक्यात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे शेती मशागती आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे.त्यातच वारंवार पाऊस होत असल्याने जमिनीला वापसा आलेला नाही. त्यामुळे वापसा नसणाऱ्या ठिकाणची पेरणी खोळंबली आहे. तर चांगल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढ्यांना पाणी वाहात आहे. अनेक गावांतील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पेरणीनंतर पिकांना पाणी कमी पडणार नाही. तसेच तलावातही साठा वाढला असल्याने पिण्याच्या पाणी योजनांना फायदाच होणार आहे. त्यामुळे अनेक गावांचे टँकरही बंद झाले आहेत.
पश्चिम भागातही पाऊस पडत असला तरी जोर नव्हता. मागील आठ दिवसांपासून पावसाची उघडझाप होती. त्यामुळे अजूनही प्रमुख धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. अशातच गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. यामुळे ओढे खळाळून वाहत आहेत. कास, बामणोली, कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वर भागात पावसाची जोर वाढला आहे. त्यामुळे लवकरच प्रमुख धरणातही पाणीसाठा वाढणार आहे.
कोयना धरणात १४.९० टीएमसी पाणीसाठाकोयना धरणात पाण्याची अजून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली नाही. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणात १४.९३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३३९ आणि नवजा येथे ४७१ तर महाबळेश्वरला ३२७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी पश्चिम भागात जून महिन्याच्या उत्तरार्धात दमदार सुरूवात झालेली.