तांबवे : भोळेवाडी येथील शिवारात शनिवारी ऊसतोड सुरू असताना कामगारांना अंदाजे २५ ते ३० दिवसांची बिबट्याची दोन बछडे आढळून आली होती. अखेर तीन दिवसानंतर ही बछडे बिबट्याच्या कुशीत गेली. कऱ्हाड वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही बछड्यांना सुरक्षित ठिकाणी दिवसा उजेडी हलविले. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याचठिकाणी कॅरेटमध्ये ठेवले. कॅरेटच्या बाजूला निगराणीसाठी कॅमेरे लावले. मात्र मादी बछडे काही कारणाने दोन दिवस घेऊन जात नव्हती. तीन दिवसांनी बछड्यांना मादीने नेले.दरम्यान, शनिवारपासून सोमवारपर्यंत तीन दिवस दोन्ही बछड्यांची वनविभागाचे डॉ. चंदन सवने व वनविभागाने विशेष काळजी घेतली. यातील एक बछडे मादी व एक नर होते. त्यापैकी नर बछडे जास्त अशक्त होते. शेपटी, मागील पायाला इजा होती. त्यासाठी तीन दिवस डॉ. चंदन यांनी उपचार केले.बछडे सापडलेल्या ठिकाणापासून शेजारी असलेल्या एका नांगरलेल्या शिवारात पिल्ले ठेवण्याची नवीन जागा निवडून रोहन भाटे यांनी विशिष्ठ पद्धतीने क्रेट मातीत ठेऊन त्यामध्ये बछडे ठेवली. क्रेटच्या दोन्ही बाजूला मादीची हालचाल टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले. क्रेटच्या आजूबाजूला दोन दिवसांपासून बिबट्यांच्या त्या बछड्यांचे मुत्र हे गोळा करून ठेवलेले होते. क्रेटच्या आजूबाजूच्या परिसरात मुद्दाम काही झाडांवर व दगडांवर टाकण्यात आले. जेणेकरून त्या वासाने माती बछड्यांजवळ येईल. रात्री बछडे जोर जोरात ओरडू लागल्याने रात्री पावणेबाराच्या सुमारास मादी बिबट्या आली. ती शिवारात रात्री दीड वाजेपर्यंत पिल्लांसोबत होती. नंतर ती पिल्लांना सुखरूपपणे घेऊन गेली.ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनखाली सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ. चंदन सवने, शीतल पाटील, उत्तम पांढरे, भरत खटावकर, शंभू माने, अमोल पाटील यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
भोळेवाडीतील बिबट्याची बछडे तीन दिवसानंतर आईच्या कुशीत, कॅमेऱ्यात घटना कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 5:47 PM