निलेश साळुंखेकोयनानगर : कोयना धरणाच्या पाणी पातळीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाणीसाठ्याने सोमवारी मध्यरात्री सांडवा पातळी गाठली आहे. धरणातील आवक वाढत राहिल्यास पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो.कोयना धरण परिसरात पंधरा दिवसांपासून पाऊस तळ ठोकून आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुलै महिन्यात सुमारे ६० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले, तर लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते. मंगळवारी सकाळी आठच्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा ७४.२२ टीएमसी झाला आहे. धरणाची सांडवा पातळी पार केली आहे. कमी झालेला पावसाचा जोर वाढल्याने, आवकही अल्प प्रमाणात वाढत २४ हजार २०१ क्युसेक्सवर पोहोचली आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविल्याने, कोयना नदीत सध्या २ हजार १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे.कोयना धरणातून पूर्वेला कोयना नदी पात्रात तीन प्रकारे पाण्याचा विसर्ग केला जातो. यामध्ये नियमितपणे पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वीजनिर्मिती करून केला जातो, तर आपत्कालीन स्थितीत पाण्याचा विसर्ग वाढविण्याची वेळ आली. धरणाच्या भिंतीच्या तळाला असलेल्या नदी विमोचकातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. नदी विमोचकातून जास्तीतजास्त ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जातो, तर ७३.१८ टीएमसी पाणीसाठा २१३३.६ फूट ही धरणाची सांडवा पातळी आहे. या पाणी पातळीनंतर धरणाच्या सहा वक्रदरवाजातून कोयना नदीत विसर्ग केला जातो. या सहा वक्रदरवाजाची २,०२,६६६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग क्षमता आहे.कोयना धरणाला टेंटर प्रकारचे सहा वक्र दरवाजे असून, त्याची लांबी १२.५० मीटर व उंची ७.६२ मीटर इतकी आहे. धरणातील पाणीसाठा ७३.१८ टीएमसी ते पूर्ण क्षमतेने म्हणजे १०५.२५ टीएमसी झाले की, सांडवा पातळीपासून वर ३२.०७ टीएमसी इतका शिवसागर जलाशयात होत असतो.
पाच वर्षांत पाणीसाठ्याने गाठलेली सांडवा पातळी२०१९: ३० जुलै२०२०: ९ ऑगस्ट२०२१: २२ जुलै२०२२: ९ ऑगस्ट२०२३: १ ऑगस्ट
चार वर्षांत सांडव्यातून विसर्ग२०१९ : ३ ऑगस्ट२०२० : १५ ऑगस्ट२०२१ : २३ जुलै२०२२ : १२ ऑगस्ट२०२३ : अद्याप नाही.
या वर्षी कोयना नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर निळी व लाल पूररेषा आखण्यात आल्या आहेत. निळी पूररेषा २५ वर्षांच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते, तर लाल पूररेषा १०० वर्षांच्या आवर्ती पुराची उंची दर्शविते. - नितीश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग.