नागठाणे : साताऱ्यातील तरुणांना वन विभागात नोकरी लावतो म्हणून अकरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याला बोरगाव पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. राजेश नंदकुमार शिंदे असे अटक केलेल्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, गणेश कृष्णा चव्हाण (वय २९, रा. सदर बझार, सातारा) यांना कऱ्हाड येथे वनपाल म्हणून नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून राजेश नंदकुमार शिंदे (३२, रा. बोरगाव, ता. सातारा) याने साडेतीन लाख रुपये घेतले. तसेच गणेश चव्हाण यांच्याप्रमाणेच इतर चार तरुणांनाही अशाच पद्धतीने आमिष दाखवून त्यांच्याकडूनही राजेश शिंदे याने पैसे उकळले. या पाच तरुणांची एकूण अकरा लाखांची फसवणूक झाली होती. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी घडला होता. संबंधित तरुणांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दिली होती. परंतु, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेश शिंदे हा फरार झाला. बोरगाव पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस त्याचे घर आहे. असे असताना तो पोलिसांना अद्यापही सापडत नव्हता.याबाबत ‘लोकमत’मधून सोमवारी वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या बोरगाव पोलिसांनी सोमवारी सकाळीच राजेश नंदकुमार शिंदे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर बोरगाव पोलिसांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
साताऱ्यातील तरुणांना नोकरीच्या आमिशाने गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, वर्षभरापासून देत होता गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:10 PM