सातारा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात आता दिग्गज नेतेही आपापल्या उमेदवारांसाठी उतरणार आहेत. या नेत्यांच्या मैदानी तोफांनी जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभांची सर्वाधिक उत्सुकता आहे.साताऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी खासदार शरद पवार यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहेत. या सभांच्या ठिकाणांची निवडही विचारपूर्वक केली आहे. वाई, पाटण आणि कऱ्हाड या ठिकाणांची निवड केली आहे. वाईतील आजी व माजी आमदार महायुतीत आहेत. पाटणला शिंदेसेनेचे शंभुराज देसाई आणि सातारा येथे भाजपची ताकद आहे. याचा विचार करून शरद पवार यांच्या दौऱ्यांचे नियोजन केले आहे. यापैकी दि. ३० तारखेच्या पाटणला आदित्य ठाकरे, तर दि. ४ रोजी साताऱ्यात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारालाही दिग्गज नेते येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा दि. २९ रोजी सैदापुर कऱ्हाड येथील ॲग्रीकल्चर ग्राउंडवर होत आहे. महायुतीने कऱ्हाड उत्तर व दक्षिण व पाटणमधील ५५ टक्के मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे. यादृष्टीने तिन्ही मतदारसंघांचा विचार करून कऱ्हाड या ठिकाणाची निवड केल्याचे दिसून येत आहे.शिवाय हातकणंगले, सांगली, माढा आदी मतदारसंघांचाही विचार करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न दिसत आहे. याशिवाय दि. १ ते ५ तारखेपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच स्मृती इराणी आदी दिग्गज नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्यात येत आहे.
सभांच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांची लगबगदिग्गज नेते आणि स्टार प्रचारकांच्या सभा असल्यामुळे मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सभांसाठी मैदान निश्चित करणे, त्याची पाहणी त्यासाठीच्या प्रशासकीय परवानग्या, सभेच्या आयोजनासाठी लागणाऱ्या सर्व बारीकसारीक बाबी यांची जुळवाजुळव सुरू आहे.
कऱ्हाड, पाटणच्या सभांची उत्सुकताकऱ्हाडला नरेंद्र मोदी यांची २९ तर पाटणला शरद पवार यांच्या ३० एप्रिलला सभा आहेत. यावेळी दोन्ही उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. या सभा किती गर्दी खेचतात, याची उत्सुकता लागली आहे.