सातारा : जिल्ह्यातील तापमानात उतार आला असून महाबळेश्वरचा पारा आणखी घसरला आहे. गुरुवारी ११.५ अंशांची नोंद झाली. तसेच सातारा शहरातही १२.५ अंश किमान तापमान होते. त्यातच वातावरणात शीतलहर असल्याने गारठा कायम असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला कमी प्रमाणात थंडी जाणवायची. रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारासच तीव्रता अधिक होती. पण, मागील १५ दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यातच दरवर्षीच डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडायची. यंदा मात्र, नोव्हेंबरच्या मध्यापासून तीव्रता वाढत गेली आहे.मागील आठ दिवसांचा विचार करता सतत किमान तापमान १५ अंशांच्या खाली राहिलेले आहे. यामुळे जिल्ह्यातून थंडीचा जोर अजूनही कमी झालेला नाही. उलट थंडीची तीव्रता वाढतच चालली आहे.सातारा शहरात मागील काही दिवसांपासून १३ अंशांदरम्यान किमान तापमान आहे. मंगळवारी शहरात १२.९ अंशांची नोंद झाली होती. पण, एकाच दिवसात तापमानात जवळपास एक अंशाची घसरण झाली. त्यामुळे बुधवारी १२ अंशांची नोंद झाली. तर गुरुवारी १२.५ अंश तापमान नोंद झाले. पण, वातावरणात शीतलहर असल्याने थंडीची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. परिणामी नागरिकांना उबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. तसेच शहरातील बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झालेला आहे. दुकानेही सकाळी उशिरा उघडली जातात. तर नागरिक दुपारच्या सुमारास खरेदीसाठी येत आहेत.महाबळेश्वरसह पाचगणी आणि परिसरातही थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत तुरळक पर्यटक दिसतात. या थंडीमुळे परिसरातील जनजीवनावर परिणाम झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागही गारठला आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
महाबळेश्वर शहरातील किमान तापमान..दि. २० नोव्हेंबर १३.२, २१ नोव्हेंबर १२.५, २२ नोव्हेंबर १४, २३ नोव्हेंबर १३.८, २४ नोव्हेंबर १३.९, २५ नोव्हेंबर १२, २६ नोव्हेंबर १२.६, २७ नोव्हेंबर ११.८ आणि दि. २८ नोव्हेंबर ११.५