सातारा : जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता वाढत असून सातारा शहराचा पाराही वाढू लागला आहे. मंगळवारी शहराचे तापमान ३८.१ अंश नोंद झाले. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. तर मंगळवारी दिवसभर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पंखे, एसी बंद राहिल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात तापमान वाढले होते. त्यावेळी सातारा शहराचा पारा ३६ अंशावर पोहोचला होता. त्यानंतर मात्र, तापमानात उतार येत गेला. त्यातच गेल्या मार्च महिन्याच्या मध्यावर अवकाळी पाऊस पडला. यामुळे तापमान आणखी खाली आले. त्यावेळी सातारा शहराचा पारा तर २९ अंशापर्यंत घसरला होता. मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तापमानात पुन्हा वाढ होत चालली आहे.मंगळवारी तर सातारा शहराचे कमाल तापमान ३८.१ अंश नोंद झाले. हे या वर्षातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ठरले. तर तापमान वाढल्याने सातारकरांना कडक उन्हाशी सामना करावा लागला. त्यातच वीज कंपनीच्या वतीने सकाळपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला. यामुळे दिवसभर नागरिकांना उकाड्याशी सामना करावा लागला. सायंकाळच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला.दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र आहेत. पारा ४० अंशाकडे झेपावू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास कामे करावी लागत आहेत. तर काही मजूर सकाळी लवकर जाऊन दुपारपर्यंत काम करून घरी परतत आहेत. तर मेंढपाळांना पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांतच पारा ४० अंशावर जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
उन्हाची तीव्रता वाढली; साताऱ्याचा पारा ३८ अंश पार, नागरिक उकाड्याने हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:29 AM