सातारा : दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा पुन्हा एकदा खालावला आहे. हवामान विभागाने रविवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २४.५ तर किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. पावसामुळे हवेत गारव्याचे प्रमाण वाढले असून, पर्यटकदेखील या थंड वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर हुडहुडी भरून येत असून, बाजारपेठेत उबदार कपडे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात रात्री व पहाटेच्या सुमारास शेकोट्याही पेटू लागल्या आहेत.
साताऱ्याचा पाराही रविवारी २०.०६ अंशांवर स्थिरावला. थंडीत हळूहळू वाढ होऊ लागली असून, येत्या काही दिवसांत थंडीत आणखीन वाढ होईल, असे सध्याचे चित्र आहे.