सातारा : सातारा जिल्ह्याला सलग पाच दिवस वळवाच्या पावसाने झोडपून काढले. दोन दिवसांपासून वळवाने पूर्ण विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यासह महाबळेश्वरचा पारा कमालीचा खालावला आहे. हवामान विभागाने मंगळवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २६.८ तर किमान १८.५ अंश सेल्सीअस इतके नोंदविले असून, पर्यटक या अल्हादादायक वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.मे महिना सुरू होताच जिल्ह्यात उष्णतेची लाट पाय पसरू लागली. साताऱ्याचा पाराही ४१ अंशांवर पोहोचला. उन्हाच्या काहिलीने जो-तो हैराण झाला. अशा परिस्थितीत वळवाच्या पावसाने हजेरी लावली अन् नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. दि. १९ ते २६ मे या कालावधीत जिल्ह्याला वळवाने जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने घरे तसेच शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. दोन दिवसांपासून या पावसाने उसंत घेतली असली तरी तापमानाचा आलेख खालावल्याने सर्वदूर पसरलेली उष्णतेची लाटही आता ओसरली आहे.थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचा पारा यंदा ३५ अंशांवर गेला होता. मात्र, वळवाच्या पावसाने येथील तापमानही ३० अंशांच्या खाली आले आहे. सोमवारी येथील कमाल तापमान २२ तर मंगळवारी २६.८ अंशांवर घसरले. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरात धुक्याची दुलई व थंडीची लाट पसरल्याने पर्यटकही सुखावले. सातारा शहराचे कमाल तापमान मंगळवारी ३४.७ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले.
पाच दिवसांतील तापमान (अंश सेल्सीअस)दिनांक / कमाल / किमान२४ मे / ३०.०१ / १८.०२२५ मे / २६.०१ / १८.०२२६ मे / २५.०२ / १८.०१२७ मे / २२.०० / १८.०१२८ मे / २६.०८ / १८.०१